मुळा-प्रवरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; भंडारदरा धरणात ८७० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक!

0
50

अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. केवळ ३६ तासांत भंडारदरा धरणात ८७० दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. तसेच, पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनच्या दमदार बॅटिंगमुळे ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पिंपळगाव खांड धरणातील १२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग मुळा धरणाकडे झेपावला आहे. मुळा नदीवर असणाऱ्या राहुरी तालुक्यातील २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे. मुळा-प्रवरा पाणलोट क्षेत्रात धुवांधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

धरणांची स्थिती:
भंडारदरा: ३०% भरले (३,२३४ दशलक्ष घनफूट)
निळवंडे: ३२% भरले (२,६२५ दशलक्ष घनफूट)
आढळा: ५५% भरले.
पिंपळगाव खांड, सांगवी, पाडोशी, वाकी यासारखी लघु पाटबंधारे धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहेत.

पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन:
भंडारदरा, निळवंडे, आणि हरिश्चंद्रगड परिसरातील धबधबे आणि निसर्गसौंदर्य खुलल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. तसेच, सततच्या पाऊसामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व धोकादायक ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here