अहिल्यानगर : शनिशिंगणापूर ट्रस्ट मधील 114 मुस्लिम कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. राजकीय दबावामुळे या मुस्लिम कर्मचार्यांना कामावरून काढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. यासंदर्भात भाजप आध्यात्मिक आघाडीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी केली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आघाडीवर होते.
याबाबत बोलताना देसाई म्हणाल्या, अजितदादा यांच्या पक्षाचे आमदार सांविधानिक पदावर काम करत असताना वारंवार आम्ही मुस्लिम कर्मचार्यांना काढून टाकू. शिर्डीत जाऊन सुध्दा हेच करू अशा धमक्या देत आहेत. अजितदादा यांनी संग्राम जगताप यांना आवर घालावा.
यासंदर्भात बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, अजितदादा सतत सांगतात त्यांचा पक्ष शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे. पक्षाच्याच विचारसरणीचा अपमान संग्राम जगताप करत आहेत. धर्माच्या आधारावर कर्मचार्यांना काढता येत नाही म्हणून कामात अनियमितता हे कारण दाखवत कर्मचार्यांना कमी करण्यात आले. याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.
तसेच, शनिशिंगणापूर ट्रस्टने आधी लिंगभेद केला. आता धर्मभेद केला जात आहे. हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे, जर मुस्लिम धर्मातील लोक शनिशिंगणापूर याठिकाणी सेवा करत असतील तर हे खूप मोठे उदाहरण आहे. असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.








