मुंबई : राज्यात पावसाळा सुरू होताच पर्यटनस्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी वाढते, अशा ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जावे. याबाबत स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या आहेत. पुण्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सोमवारी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
धोकादायक स्थळांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या यासाठी मुख्य सचिव सौनिक यांनी निर्देश दिले आहेत. पावसाळ्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर योग्य साइनबोर्ड लावावेत आणि सर्व सुरक्षा उपाय पूर्ण होईपर्यंत ती स्थळे तात्पुरती बंद ठेवावीत. याशिवाय, अशा ठिकाणी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी. विशेषतः धोका असूनही त्या भागात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह व वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.








