संगमनेर : महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ झाला आहे. स्पर्धेचा पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रंगला. हा सामना संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुलात सौराष्ट्र संघाच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत 15 षटकात 127 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यावेळी दिव्यांग खेळाडूंची जिद्द, आत्मविश्वास आणि क्रिकेटवरील प्रेम पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला.
आमदार अमोल खताळ यांनी दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासोबतच रेशन कार्डधारकांसाठी योग्य लाभ योजना राबविल्याचे सांगितले. पुढील वर्षी ही क्रिकेट स्पर्धा अधिक भव्य करण्याचे आश्वासन देत, दरवर्षी क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. संगमनेरकरांसाठी ही स्पर्धा केवळ एक खेळ नसून, प्रेरणेचा एक स्त्रोत आहे. अशा सामन्यांना उपस्थित राहून दिव्यांग बांधवांचे मनोबल वाढवण्याचे आवाहन आमदार खताळ यांनी केले.
गेल्या तीन वर्षांपासून ही स्पर्धा यशस्वीपणे भरवली जात असल्याची माहिती क्रिकेटपटू जमीर पठाण यांनी दिली. या उपक्रमासाठी मोसीन शेख, नितीन वाबळे, नीलेश भिंताडे, अन्वी अंजू यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच, स्पर्धेच्या विजेत्या संघासाठी ट्रॉफी बाबासाहेब परजणे यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.








