स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५: अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणी होणार

0
45

अहिल्यानगर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५’ या उपक्रमाची जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पातळीवर पडताळणी होणार आहे. लवकरच केंद्र शासनाच्या निरीक्षक पथकाद्वारे घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच ग्रामस्थांच्या सहभागाची कसून पाहणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, तसेच सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करावा. लोकसहभाग व श्रमदानातून गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

या सर्वेक्षणात ग्रामपंचायतींना एकूण १००० गुणांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर १२० गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादावर १०० गुण, सुविधांचा वापर आणि व्यवस्थापनावर २४० गुण, प्रत्यक्ष पाहणी व प्रश्नावलीच्या माध्यमातून ५४० गुण, या सर्वेक्षणाची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत होणार असून, प्रत्यक्ष ग्रामभेटीदरम्यान कुटुंबांची गृहभेट, शौचालय वापर, हात धुण्याच्या सवयी, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींवर गुण दिले जातील. प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन केंद्र, खतखड्डे, गोबर प्रकल्प, मैलागाळ व्यवस्थापनाचीही तपासणी होणार आहे.

गावातील धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी, बाजारतळ या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व सुविधा वापराची स्थिती महत्वाची ठरणार आहे. या सर्वेक्षणात शाश्वत स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजनांनाही गुण दिले जाणार आहेत. भविष्यात बचत गट किंवा इतर संस्थांमार्फत या सेवा कायमस्वरूपी चालविण्याचे नियोजन असणे गरजेचे आहे.

गावात दररोज किंवा आठवड्यातून किती वेळा कचरा संकलन होते, कोणत्या वाहनाद्वारे तो वाहून नेला जातो, मैलागाळ उपसण्यासाठी शासकीय किंवा खासगी वाहनांची माहिती दर्शनी भागात लावलेली आहे का, याबाबतही पाहणी केली जाणार आहे.

स्वच्छता, जलव्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त गाव निर्माण करून राज्य व देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत’ म्हणून गौरव मिळवण्याची संधी ग्रामपंचायतींना या उपक्रमातून प्राप्त होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here