शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर, नगरसेवकांची संख्या वाढल्याने प्रभागांमध्ये चुरस

0
40

शिर्डी : अध्यात्मिक नगरी शिर्डी शहराला आता ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर येणाऱ्या काळात नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, स्थानिक राजकारणात घडामोडींनी वेग आला आहे. विशेष म्हणजे यंदा लोकसंख्येच्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या 17 वरून 23 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्साह असून अनेक राजकीय कार्यकर्ते मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत.

नवीन प्रभाग रचना; प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक
महाराष्ट्र शासनाच्या सुधारित प्रभाग रचनेनुसार, यंदाच्या निवडणुकीत ‘दुहेरी प्रभाग’ पद्धती राबवली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची, नाट्यमय आणि रंगतदार होणार आहे. परंतु, यामुळे एकाच प्रभागातून निवडून येणाऱ्या दोन नगरसेवकांमध्ये श्रेय घेण्यावरून वाद, मतभेद आणि राजकीय वैर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरसेवकांची संख्या वाढली, नवे चेहरे पुढे येणार
2011 च्या जनगणनेनुसार शिर्डीची लोकसंख्या 36,004 इतकी होती. या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नगरसेवकांची संख्या 17 वरून 23 वर करण्यात आली आहे. या वाढीव 6 जागांमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना राजकारणात उतरून आपली राजकीय ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

सर्वपक्षीय हालचालींना वेग
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष इच्छुक, आणि स्थानिक गटांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विविध समाजघटकांमध्ये प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी जातीय, सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काही भागात घराघरात संपर्क मोहीम सुरू झाली असून सोशल मीडियाचाही वापर प्रचारासाठी केला जात आहे.

शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणते नवे चेहरे पुढे येणार? आणि नव्या युगाची सुरुवात कोण करणार? याची उत्सुकता जनतेत पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here