संगमनेरमध्ये माजी नगराध्यक्षांच्या घरावर पहाटे जीवे मारण्याच्या हेतूने हल्ल्याचा प्रयत्न; १७ जणांवर गुन्हा

0
50

संगमनेर :  माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्यनगर येथील निवासस्थानावर तसेच नेहरू चौकातील एका नागरिकाच्या घरी मंगळवारी (दि. २२ जुलै) पहाटेच्या सुमारास दहा ते पंधरा सशस्त्र तरुणांनी अचानक हल्ल्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास विश्वास मुर्तडक यांचे पुतणे वैष्णव यांना घराबाहेर बोलावण्याचा प्रयत्न करण्यात आला. चैतन्यनगरमधील त्यांच्या निवासस्थानासमोर तीन वाहने उभी करून संशयितांनी दरवाज्यावर लाथा मारत “वैष्णव तू खाली ये” अशी आरडाओरड केली. मात्र घरातील व्यक्तींनी प्रसंगावधान राखून दार न उघडता पोलिसांना माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांकडे काठ्या, लोखंडी रॉड, गज, आणि गुप्ती आढळल्या. आरोपी अंकुश जेधे याने वैष्णव मुर्तडक यांना मोबाईलवर फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. “सुदैवाने तू खाली आला नाहीस, नाहीतर संपवलं असतं. उद्या सकाळी बघतोच तुला,” असे त्याने फोनवर धमकावले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याच रात्री नेहरू चौकातील भाजी विक्रेते शीतलकुमार कानकाटे यांच्या घरासमोरही अशाच प्रकारचा प्रकार घडला. त्यांच्या फिर्यादीनुसार, विश्वास निसाळ व संतोष गायकवाडसह पाच ते सहा जणांनी त्यांच्या घरासमोर येत त्यांचा मुलगा आदित्य याच्या नावाने शिवीगाळ केली आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

या दोन्ही तक्रारींवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये विश्वास निसाळ, अंकुश जेधे, संतोष गायकवाड, सनी धारणकर यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

या प्रकरणामुळे संगमनेरच्या सामाजिक शांततेला बाधा पोहोचली असून, यामागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. शहराच्या राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here