साकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीचे शिक्षणाधिकारी पाटील यांच्याकडून कौतुक

0
59

संगमनेर : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या ही चिंतेचा विषय ठरत असतानाच संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मात्र आदर्श ठरत आहे. नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या शाळेला भेट देत शाळेची पाहणी केली. यावेळी काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध कार्यप्रणाली आणि शैक्षणिक गुणवत्तेने प्रभावित होत त्यांनी शाळेचे तसेच ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी पाटील यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी दिलेली अचूक उत्तरे ऐकून शिक्षकांचाही गौरव केला. “अशीच उत्कृष्ट गुणवत्ता टिकवा,” असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.

यानंतर त्यांनी शाळेची इमारत, परिसर, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही कॅमेरे, पटसंख्या, पोषण आहार व्यवस्था आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली. सर्वच बाबतीत समाधानकारक व्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून सव्वाशे वर्षांपूर्वीचे जीर्ण विद्यार्थी नोंदणी रजिस्टर लॅमिनेशन करून जतन करण्यात आले आहे. हे रजिस्टर पाहून शिक्षणाधिकारी पाटील आश्चर्यचकित झाले. “अशी जपणूक मी प्रथमच पाहिली,” असे त्यांनी सांगत ग्रामपंचायतीसह शाळेचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here