चंदनापुरीत दोन दुकाने फोडून ४ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
41

संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन दुकाने फोडून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा माल लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे चोरट्यांनी अंधाराचा पुरेपूर फायदा घेतला. या घटनेमुळे चंदनापुरीसह परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

या चोरीत अक्षय सुनील पाचोरे यांच्या रॉयल अॅग्रो सर्व्हिसेस या कृषी केंद्राचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे ४० हजार रुपयांची रोख रक्कम व इतर कृषी साहित्य असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या सागर रहाणे यांच्या सन मार्ट सुपर शॉपीचे पत्रे मागील बाजूने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. येथे त्यांनी किराणा माल, खाद्यपदार्थ, डीजे साठी वापरण्यात येणारे महागडे मिक्सर यांसह अंदाजे ४ लाख १० हजार रुपयांचा माल लंपास केला. या दोन्ही दुकानांमधील चोरीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक देविदास दुमणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर देवकाते, शांताराम झोडगे आणि बाबासाहेब शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही दुकानमालकांकडून तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. प्राथमिक चौकशीत ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पथदिवे बंद असल्याचा चोरट्यांना फायदा

पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि त्यालगतच्या सर्व्हिस रोडवरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात पूर्ण काळोख पसरत असल्यामुळे चोरट्यांना चोरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदाराकडून या पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणामुळे चोरीच्या घटना वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या घटनेनंतर व्यापारी वर्ग आणि स्थानिक रहिवासी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सलग दोन दुकाने फोडल्याने परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी,  महामार्गालगतच्या पथदिव्यांची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here