शेतकऱ्याकडे सातबारा नोंदीसाठी पैशांची मागणी; लाचलुचपत विभागाने पकडला भ्रष्ट तलाठी रंगेहाथ

0
36

पारनेर : जमिनीच्या खरेदीखताची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तडजोडीनंतर ८ हजार रुपये स्वीकारताना वाडेगव्हाण येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) दिपक भिमाजी साठे (३६, रा. हंगा, ता. पारनेर) याला अटक करण्यात आली.

तक्रारदाराने आपल्या मुलगा व दोन पुतण्यांच्या नावावर १ एकर २० गुंठे शेती चुलत भावाकडून खरेदी केली होती. या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर करून घेण्यासाठी ते ग्राम महसूल अधिकारी साठे यांच्याकडे गेले. त्यावेळी “माझीच डिजिटल सिग्नेचर लागणार आहे तुमचे काम मीच करणार आहे” असे सांगत १० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने ही बाब १७ सप्टेंबर रोजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मांडली. त्यानंतर विभागाने पडताळणी करून सापळा लावला. तडजोडीनंतर ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना साठे याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर सुपा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उपअधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळधर व चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here