PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली असून शनिवारी, २ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांना योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी ९० लाख रुपये जमा होणार आहेत. अशी माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
पीएम किसानचा १९ वा हफ्ता फेब्रुवारीमध्ये वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांना विसावा हप्ता कधी होईल याची प्रतीक्षा होती. याबाबत अनेकदा तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र आता २ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात २० वा हप्ता जमा होणार आहे.
शेतकरी किसान सन्मान योजने अंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये अनुदान देण्यात येते. वर्षभरात असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पंतप्रधान मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्याला आता 4 महिने होत आले आहेत. त्यामुळे आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत होते.
या अनुदानामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा आधार मिळणार आहे. बियाणे, खते, किटकनाशके व शेतीसाठी लागणाऱ्या इतर आवश्यक गोष्टींसाठी निधीचा उपयोग करता येणार आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत दिलासा देणारी ठरत असून यामुळे त्यांची शेती अधिक सक्षम होण्यास मदत होईल. सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकरी सशक्त होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जात आहे.








