चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या, घारगावातील घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ

0
48

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुन्हाडीने डोक्यावर व गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवार, ३१ जुलैच्या मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रकला दगडू खंदारे (वय ५०, रा. घारगाव) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पती दगडू लक्ष्मण खंदारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी दगडू खंदारे हे घारगावचे रहिवासी असून ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे कुटुंब लहान असून त्यांचा मुलगा आणि सून देखील शेजारीच राहतात. दगडू खंदारे हे पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद घालत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी गावातील एका व्यक्तीवर पत्नीच्या अनैतिक संबंधांचा आरोप करत त्याच्याशी वादही घातला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाने व इतरांनी त्यांना समजावून सांगितले होते.

दरम्यान, बुधवार, ३० जुलै रोजी रात्री ८.३० वाजता संपूर्ण कुटुंब जेवणासाठी एकत्र बसले असताना दगडू खंदारे यांनी पुन्हा पत्नीवर संशय घेत शिवीगाळ करत तिला घर सोडून जाण्यास सांगितले. वाद वाढला आणि पुन्हा ते पत्नीला शिवीगाळ करत घरात गेले.

रात्री १ वाजता मुलगा वडिलांनी झोप घेतली का हे पाहण्यासाठी शेतातील घरी गेला, मात्र वडील तिथे नव्हते. मात्र त्याठिकाणी आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याने पाहिले. तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा जागीच मृत्यू झाला होता. वडील गायब असल्याचे लक्षात येताच मुलाने पोलिसांत धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी दगडू खंदारे याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत. दरम्यान, ही घटना संपूर्ण गावात खळबळ उडवणारी असून कौटुंबिक वाद व संशयाचे भीषण रूप कशाप्रकारे घातक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here