पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. अवघ्या १५ दिवसांत जांबूत व पिंपरखेड भागांत दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले असून, नागरिकांनी वन विभागाच्या गस्ती वाहनाची मोडतोड व जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
हिंसक बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घराजवळ खेळत असताना शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला केला. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
गेल्या १५ दिवसांत पिंपरखेड गावात ६ आणि जांबूतमध्ये ३ असे एकूण ९ हिंसक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. पिंपरखेड येथे १५ दिवसातील तिसरी घटना आहे. दरम्यान आता या बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश शिरूरमध्ये वनविभागाकडून देण्यात आले आहेत.








