कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठामधील प्रसिद्ध महादेवी हत्तीण न्यायालयीन आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती केंद्रात रवाना करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील नव्हे तर संपुर्ण राज्यातील नागरिकांच्या मनात भावनिक असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याने वनतारा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी आणि त्यांची टीम मुंबईवरून नांदणीसाठी रवाना झाले आहेत. ते नांदणी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत.
महादेवीच्या निरोपावेळी नांदणी गावात भावूक वातावरण आणि सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू होते. येथील लोकांच्या भावना ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणीमध्ये गुंतल्या असल्याने भावनिक झालेल्या स्थानिकांचे व्हीडिओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनता भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी वनतारा टीमशी चर्चा केल्यानंतर भेट देण्याचे ठरले.
खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरवठा सुरू असून याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी हे नांदणी येथे महाराजांची भेट घेणार आहेत. ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पातून पुन्हा नांदणी येथे आणण्यासाठी हालचालींना आता वेग आला आहे.
वनतारा सीईओ विहान करणी, जय पेंढारकर, साहिल शेख, अजित कुमार धनी राम सरोज, विजय शितोळे आणि खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह सर्व टीम कोल्हापूर साठी रवाना झाली आहे.








