शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीच्या सुत्रधाराला अटक

0
50

संगमनेर : सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात आर्थिक फसवणूकींचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणार्‍या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.  चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याने शिर्डी, राहाता परिसरातील अनेकांना गंडा घातला आहे.

राहाता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करून आरोपीला बुधवारी राहाता येथील एम.पी.आय.डी. विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपी भूपेंद्र सावळे याला 9 दिवसांची (25 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

शितल गोरखनाथ पवार (वय 33, रा. पैजनबाबाचा मळा, राहाता) यांनी 4 जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भूपेंद्र सावळे याच्यासह भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे व राजाराम भटू सावळे (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिर्डी व राहाता येथील दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत.

गुंतवणूकदारांना आवाहन

भूपेंद्र सावळे याने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शिर्डी व राहाता परिसरातील शेकडो लोकांना ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले आहे. गुंतवणुकदारांनी आता कोणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्याकडील कागदपत्रे घेऊन येथील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here