शिर्डी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (पिटा) शिर्डीतील चार हॉटेल्सना सील ठोकण्यात आले असून 8 पुरुष व 6 महिलांना अटक करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशाने, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या पथकाने केली. पूर्वीच पिटा कायद्यान्वये कारवाई झालेल्या हॉटेल्सवर सील करण्यासाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. परवानगी मिळताच पोलिसांनी कारवाई केली.
साई वसंत विहार लॉज (सोनार गल्ली), हॉटेल साईइन (दत्तनगर, पिंपळवाडी रोड),हॉटेल साई वीरभद्र (सुतार गल्ली), हॉटेल शीतल (निमगाव) हे हॉटेल सील करण्यात आले आहेत.
या मोहिमेत 18 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करत 14 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. दारूबंदी कायद्यान्वये 4 गुन्हे दाखल होऊन 12,040 रुपयांचा मुद्देमाल, तर जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात 65,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, 2013 पासून फरार असलेला आरोपी शंकर वेरणस्वामी आणि पाहिजे असलेला दिनेश मोकळ पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
या कारवाईत उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचा मोठा सहभाग होता. यामध्ये गणेश धुमाळ, निवांत जाधव, सागर काळे, विजय गोलवड, तसेच इतर जवळपास 30 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.








