शिर्डीचं नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित; प्रस्थापित कुटुंबांना धक्का

0
64

शिर्डी : शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून, नुकत्याच जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. हे पद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित ठरल्याने अनेक दिग्गज इच्छुक नेत्यांना अनपेक्षित धक्का बसला आहे.

शिर्डी हे साईबाबांच्या समाधीमुळे जगप्रसिद्ध असलेले शहर असून, इथल्या नगरपरिषदेवर दीर्घकाळ प्रस्थापित कुटुंबांचे वर्चस्व राहिले आहे. कोते, शेळके, गोंदकर, जगताप आणि गायके या कुटुंबांनी राजकारणात ठसा उमटवला आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी या कुटुंबांतील अनेक सदस्यांनी तयारी सुरू केली होती.

मागील काही महिन्यांपासून इच्छुकांनी विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेत मतदारांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासारख्या सणांमध्ये आर्थिक व सामाजिक मदत देत जनसंपर्क मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र आरक्षण जाहीर होताच या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.

सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील अनेक दावेदारांचे स्वप्न तुटले असले, तरी अनुसूचित जाती समाजात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे आमच्या समाजाला प्रतिनिधित्वाची संधी मिळाली, अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

आता या नव्या समीकरणामुळे शिर्डीतील राजकीय गणितच बदलणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रस्थापित घराण्यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here