राहुरीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे लाच घेताना रंगेहाथ सापडले

0
47

अहिल्यानगर : राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने शुक्रवारी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सेवानिवृत्त ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून करण्यात आली.

तक्रारदार हे माजी ग्रामसेवक असून, पूर्वी त्यांच्यावर सुधाकर मुंडे यांच्या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. निलंबनाच्या कालावधीतच संबंधित ग्रामसेवक निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांच्या विरोधातील अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडून पाठवायचा होता. मात्र, तो अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी सुधाकर मुंडे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारतानाच त्यांना अटक करण्यात आली.

सुधाकर मुंडे हे वर्ग एकचे अधिकारी असल्यामुळे, नगर शहरातील ऐश्वर्या नगरी (पाईपलाईन रस्ता, श्रीराम चौक) येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्यांच्या मालकीचे स्वतःचे घर, एक आलिशान कार, ७० हजार रुपये रोख रक्कम व सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने सापडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून, याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here