संगमनेर शहरात दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; ३५ जण ताब्यात, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
56

संगमनेर : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिम सुरू आहे. त्यानुसार पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एक मोठी कारवाई करत संगमनेर शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला. या कारवाईत एकूण ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संगमनेर शहरातील काही भागांत मटक्याचे अड्डे गेल्या काही महिन्यांपासून गुप्तपणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती खात्रीशीर असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस पथकाने लगेच कारवाईसाठी रणनीती आखली. योग्य वेळी दोन ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर मटका खेळणारे आणि चालवणारे आरोपी ताब्यात घेण्यात आले.

या छाप्यांदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन्स, मटका चिठ्ठ्या, वह्या, जुगार साहित्य व अन्य उपकरणे जप्त केली आहेत. एकूण सुमारे १० लाख ४५ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारी कारवायांना चांगलाच चाप बसला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाचे अवैध व्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत. मटका, जुगार, ड्रग्स अथवा कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा स्पष्ट सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्या आहेत.

संगमनेर शहरात एकाचवेळी दोन ठिकाणी धाड टाकून करण्यात आलेली ही मोठी कारवाई पोलिसांच्या तत्परतेचे आणि जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक मानले जात आहे. नागरिकांनीही अशा अवैध कारवायांविषयी माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here