राष्ट्रवादीत नाराजीचे सूर! संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढली

0
47

अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या डोकेदुखीमध्ये वाढ होत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. संग्राम जगताप यांच्या अलीकडील धर्माबाबत वादग्रस्त विधानांमुळे आणि पक्ष बैठकीला त्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना पक्षाच्या बैठकीला बोलावले होते, मात्र जगताप यांनी या बैठकीला दांडी मारली. पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर अजित पवार सातत्याने भर देत असताना, काही आमदारांची वादग्रस्त विधाने आणि कृती पक्षासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, “संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्वधर्म समभाव हीच आमची ओळख आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आम्ही मानतो आणि त्यांच्याच मार्गावर पुढे जात आहोत.”

दरम्यान, संग्राम जगताप यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहण्यामागचं कारण स्पष्ट करताना सांगितले की, “सध्या जिल्ह्यातून विविध दिंड्या प्रस्थान करत आहेत. या धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मी व्यस्त होतो. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मी अजित दादांशी स्वतः चर्चा करणार आहे. कोण काय तक्रार करतं याला मी फारसं महत्त्व देत नाही. तक्रार करणारे आमच्या पक्षातील नाहीत तर वेगळ्या विचारांचे लोक आहेत.”

सध्या संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे पक्षातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि यावर पुढे काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जगताप यांची कृती पक्षाला परवडणारी नाही, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here