संगमनेर : संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे, असे आवाहन नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केले आहे. तसेच संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी मिळविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे आमदार खताळ यांनी नमूद केले.
अग्निशमन सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत संगमनेर नगरपालिकेला ‘मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन’ प्राप्त झाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात महायुतीचे अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी संगमनेरच्या विकासकामांना गती देण्याचा निर्धार केला.
आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि कार्यकर्त्यांना यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास विभागाच्या सहाय्याने संगमनेरच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांना मजबुती देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोल्हापूर शहराच्या पुरनियंत्रण व पायाभूत सुविधांसाठी जसे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला, तसेच संगमनेरसाठी देखील निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
तसेच, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. या निधीच्या माध्यमातून संगमनेरची आर्थिक, सामाजिक आणि नागरी प्रगती गतीमान होईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या संकल्पासाठी एकत्र येऊन प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.








