पारनेरमध्ये दुर्दैवी घटना; धान्यात ठेवलेल्या कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू

0
35

पारनेर : नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरम वस्तीवर धान्य टिकवण्यासाठी लावलेल्या पावडरच्या वायू गळतीने दोन चिमुकली दगावली. हर्षद विठ्ठल धरम (५ महिने) व नैतिक विठ्ठल धरम (५ वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेत त्यांची आई सोनाली विठ्ठल धरम या वासाने बेशुद्ध पडल्या असून, अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी संकाळी ही घटना घडली.

संतप्त झालेल्या नागरिकांनी साडेचार वाजता अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस निरीक्षक समीर बारवकर आदींनी घटनास्थळी भेट देत नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा केली. चर्चेअंती तोडगा काढल्यानंतर सायंकाळी दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार केले.

नेमके काय घडले?

ढोकी येथील धरम वस्तीवरील विठ्ठल धरम यांनी बाजरीला कीड लागू नये, म्हणून ‘सेलफॉस’ पावडर गुरुवारी रात्री पोत्यात ठेवली. शुक्रवारपासून या कुटुंबातील हर्षद व नैतिक या दोन्ही मुलांसह आईला मळमळ व उलट्यांचा त्रास व्हायला लागला. रविवारी पहाटे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

धान्याला कीड लागू नये, यासाठी ‘सेलफॉस’ पावडर वापरली जाते. ही पावडर अतिविषारी असून अल्युमिनियम फॉस्पेट हा घटक असल्याने वापर झाल्यानंतर त्याचा रासायनिक गॅस तयार होतो. या पावडरीवर बंदी नाही. ती कशी वापरायची, यासंदर्भातील सूचना पाकीटावर दिल्या आहेत.
गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी, पारनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here