अहिल्यानगर : हुबेहूब ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अहिल्यानगर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५९ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा, तसेच २ कोटी १६ लाख रुपयांचा कच्चा माल आणि अत्याधुनिक छपाई साहित्य असा एकूण २ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई एका पानटपरी चालकाच्या सतर्कतेमुळे शक्य झाली. बनावट नोट दिल्याची शंका आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली आणि या माहितीवरून पोलिसांनी रॅकेटवर धाड टाकली. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत या पानटपरी चालकाच्या सजगतेचे कौतुक करत त्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ही घटना अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी परिसरात उघडकीस आली. येथे सिगारेटच्या पाकिटासाठी बनावट नोट वापरणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली. पुढील तपासात तिसगाव, वाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथे भाड्याने घेतलेल्या बंगल्यांमध्ये बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हे ठिकाण तात्काळ सील करत छपाई यंत्रसामग्री जप्त केली.
छाप्यादरम्यान पोलिसांच्या हाती २०२१ पासूनच्या आर्थिक व्यवहारांची नोंद असलेली एक डायरी लागली आहे. त्यामुळे हा कारखाना मागील तीन वर्षांपासून सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरी नोट घेऊन बदल्यात दुप्पट बनावट नोटा देण्यात येत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
या प्रकरणातील संशयितांची अजून कसून चौकशी सुरू असून, या बनावट नोटा बाजारात कशा पद्धतीने वितरित केल्या जात होत्या, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या नोटा इतक्या हुबेहुब आहेत की सर्वसामान्यांना त्यातील फरक ओळखणे अवघड होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अशी कुठलीही नोट सापडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.








