घरात महसूल मंत्री असतानाही इंदिरानगरच्या ७०० कुटुंबांना झुलवत  ठेवलं, आता श्रेय घेण्यासाठी तांबेंचा आटापिटा

0
127

संगमनेरवर गेली चाळीस वर्षे कॉंग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्ता गाजवली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या इंदिरानगर परिसरात गेल्या ४०-५० वर्षांपासुन ७०० गरीब कुटुंब राहत आहेत. नियमितपणे घरपट्टी आणि नळपट्टी भरतात, तरीही आजतागायत त्यांच्या नावावर जमीन नाही. गेल्या विधानसभा निवडणूकीत उलथापालथ झाली आणि माजी मंत्री थोरातांना जबरी धक्का देत अमोल खताळ आमदार झाले. आता इंदिरानगर परिसरातील नागरिकांसाठी गंभीर बनलेला प्रश्न सुटत आहे. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दाखवत तातडीने नागरिकांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

अनेक वर्षे सत्ता आणि स्वत: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असताना याप्रकरणाची दखल घेतली गेली नाही. मात्र पदवीधर आमदार सत्यजित तांबे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी ७०० कुटुंबांना न्याय देण्याची सकारात्मकाता दाखवली याचे श्रेय घेवू पाहत आहेत. आपल्याच पाठवपुराव्याने हा निर्णय घेतला, मीच हे काम केले असा आविर्भाव पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा आहे. परंतु तुमच्या घरातील महसूल मंत्री असताना ४०-५० वर्षांपासून गोरगरीब कष्टकरी नागरिकांना का झुलवतं ठेवलं? मतांच्या राजकारणासाठी आणि एकहाती सत्ता टिकवण्यासाठी की काय? असा सवाल इंदिरानगरमधील रहिवाशी करत आहेत.

चाळीस-पन्नास वर्षे ७०० पेक्षा जास्त कुटुंबांची याठिकाणी घरं आहेत. मात्र त्यांना कायदेशीर जमिनीचे हक्क मिळाले नाहीत. यामागचे मुख्य कारण म्हणजे तत्कालीन स्थानिक सत्ताधाऱ्यांची उदासीनता. तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी अनेकदा आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात यावर कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही. असा आरोप इंदिरानगरचे नागरिक करत आहेत.

वर्षानुवर्षे निवडणुकीत आश्वासन देऊन प्रशासनाकडून झुलवत ठेवले गेले. बाळासाहेब थोरात यांच्या आमदारकीच्या काळापासून फक्त वेळकाढूपणा केला असल्याचे मत स्थनिक उघडपणे मांडत आहेत. आता मात्र परिस्थितीत बदल झाला आहे. संगमनेरमध्ये महायुतीचे नवे आमदार अमोल खताळ झाल्यानंतर त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि महसूल मंत्रालयातील संपर्कामुळेच या विषयाकडे गांभीर्याने पाहिले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here