अहिल्यानगर : राज्यभरात २५ नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत पार पडलेल्या २१व्या पशुगणनेचा अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत असताना, नगर जिल्ह्यातील प्राथमिक माहितीमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या २०व्या पशुगणनेच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील एकूण पशुधनात तब्बल १४ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१९ मध्ये जिल्ह्यात ३० लाख ७८ हजार ४३० पशुधनाची नोंद होती, तर २०२५ च्या प्राथमिक माहितीप्रमाणे ही संख्या आता २६ लाख ६८ हजार ६४० इतकी खाली आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पशुपालन क्षेत्रासाठी हे मोठे संकट मानले जात आहे.
गायी, म्हशी आणि शेळ्यांची संख्या घटली
पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २०१९ मध्ये १३ लाख ४६ हजार ४३७ गायी होत्या, त्यांची संख्या यंदा १३ लाख २९ हजार ६५० इतकी झाली आहे. तसंच म्हशींच्या संख्येतही मोठी घट झाली असून, मागील गणनेत २ लाख ९ हजार ७२७ म्हशी होत्या, त्या यंदा १ लाख ७० हजारांवर आल्या आहेत.
शेळी व मेंढी वर्गातील प्राण्यांच्या संख्येत सर्वाधिक म्हणजे जवळपास २५ टक्क्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये ११ लाख ६० हजार शेळ्या व मेंढ्या होत्या, त्या यंदा केवळ ८ लाख ४७ हजार इतक्या नोंदवल्या गेल्या आहेत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळ
शेतीला पूरक असलेले पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, डुक्करपालन आदी उपक्रम ग्रामीण भागात उत्पन्नाचे स्त्रोत तयार करतात. भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे रोजगाराचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे पशुधनात आलेली ही घट ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.








