अहिल्यानगर : दुध कांडी पशुखाद्याची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून नगरजवळील धनगरवाडी येथील एका शेतकऱ्याची तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पुण्यातील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोपट भिवसेन शिकारे (वय ४५, रा. धनगरवाडी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकारे यांच्याशी विलास आनंदा कासुर्डे व स्वप्निल मोरे (रा. स्वारगेट, पुणे) यांचा संपर्क झाला होता. त्यांनी दुध कांडी पशुखाद्याची डिलरशीप मिळू शकते, असे सांगत त्यासाठी ३ लाख रुपये मागितले. डिलरशीप मिळेल या विश्वासाने शिकारे यांनी त्यांना रक्कम दिली.
यानंतर अनेकदा संपर्क साधूनही आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले आणि नंतर फोन घेणे टाळले. अखेर शिकारे स्वतः पुण्यात त्यांच्या कार्यालयात गेले असता तेथे कार्यालय बंद असल्याचे आढळले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास आनंदा कासुर्डे व स्वप्निल मोरे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.








