नाशिक : जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असतानाच, नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मोठे विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. “मला नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा काहीही हट्ट नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या पदासाठी रस नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर भुजबळांनी स्पष्ट भूमिका घेत “माझा तसा काही आग्रह नाही,” असे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भुजबळ बोलताना म्हणाले, मला नाशिकसाठी जे करायचे होते ते मी पालमंत्री असलो किंवा नसलो तरी करत राहील. त्यामुळे भुजबळांनीच पालकमंत्रीपदाचा हट्ट सोडल्याने दादा भुसे व गिरीश महाजन यांना दिलासा मिळाला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील अस्वस्थता कायम असतानाच भुजबळांच्या या वक्तव्यामुळे राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भुजबळांना पालकमंत्रीपदात काही रस दिसत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नेत्यांच्या भेटीगाठी वाढत असून, भुजबळ यांनीही द्वारका सर्कल परिसराची पाहणी केली.








