नाशिक : नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि खासदार राहुल शेवाळे, आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
नाशिक विभागातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी हजेरी लावली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती आखण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
राज्यात शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिक विभागात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्याकडून विशेष मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, बैठकीनंतर अहिल्यानगरचे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबूशेठ टायरवाल यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत दोन गट आपापसात भिडले. घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद शांत करण्यात आला.
याप्रकरणी आमदार अमोल खताळ म्हणाले की, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेला उपस्थित होते. आतमध्ये वाद झालेला नाही, बाहेर झाला असेल तर मला माहित नाही. बैठकीत कोणत्याही विषयावरून वाद झाला नाही. पक्षाच्या स्तरावर मुख्य नेते एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. मी शिवसेना पक्षात नवीन आमदार आहे. बैठकीमध्ये कोणताही वाद झाला नाही. गैरसमजीतून हा वाद झाला का? यावर वरिष्ठ निर्णय घेतील. सचिन जाधव हे आमचे पदाधिकारी आहेत. एकनाथ शिंदे साहेब यांना या प्रकरणाचा अहवाल दिला जाईल. वादाची मला कोणतीही माहिती नाही, मी माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.








