नाशिक : राज्यातील पाणी प्रश्न आजवर श्रेयवादाच्या लढाईत सुटले नसल्याकडे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले. निळवंडे धरणाचा दाखला देत त्यांनी राज्यातील एका नेत्याने तीनवेळा या धरणाचे भूमीपूजन केल्याचा टोला हाणला. हा टोला थेट काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली.
कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात नाशिक येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमचं निळवंडे धरण 35 वर्ष लागले पूर्ण व्हायला आणि त्या धरणाचे महाराष्ट्रातील एका नेत्याने तीनदा भूमिपूजन केले. प्रत्येक भूमिपूजनाला सांगायचं विखे पाटलांचा धरणाला विरोध आहे आणि हे सांगण्यासाठीच तीनदा भूमिपूजन झाले. शेवटी हे धरण पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारला यावं लागलं. असा निशाणा विखे पाटील यांनी विरोधक थोरातावर साधला आहे.
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी संबंधितांना श्रेय गेल्यास आपले काय होईल म्हणून दुर्लक्ष केल्याची टीका जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी केली. अखेर महायुती सरकारच्या काळात निळवंडे धरण पूर्ण होऊन त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जलसंपदामंत्री विखे पाटील हे बोलत होते. याप्रसंगी अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री ॲड माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे यांच्यासह अहिल्यानगर व नाशिकमधील महायुतीचे अनेक आमदार उपस्थित होते.








