अहिल्यानगर येथे डाळिंब व्यापाऱ्याकडून शेतकर्‍याची फसवणूक; जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0
28

अहिल्यानगर : जिल्ह्यातील तांदळीवडगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने प्रचंड मेहनत आणि संकटांचा सामना करून डाळिंबाची सोन्यासारखी बाग फुलविली. साडेदहा लाख रुपयांत ही बागेतील संपुर्ण डाळिंब व्यापाऱ्याला विकण्याचा व्यवहार ठरला होता. परंतु ठरल्याप्रमाणे रक्कम न मिळाल्याने आणि वारंवार व्यापाऱ्याच्या दमदाटीला कंटाळून अखेर शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपविले.

किरण पोपट ठोंबरे (वय ३२, रा. तांदळीवडगाव, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी व्यापारी नितीन बबन शिंदे (रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पोपट दशरथ ठोंबरे (वडील) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण शेतकरी किरण ठोंबरे याने मोठ्या मेहनतीने डाळिंब पिकवले. ते कर्जत येथील व्यापाऱ्यास विकले, साडेदहा लाख रुपयांत हा व्यवहार ठरला होता. त्यातील ३ लाख ४९ हजार रुपये व्यापाऱ्याने आईच्या बँक खात्यात जमा केले, मात्र उर्वरित सात लाख रुपयांचा भरणा केला नाही.

पैशांसाठी सतत मागणी करूनही व्यापाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय मागणी केल्यावर उलट शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. हाताशी आलेले उत्पन्न न मिळाल्याने किरण यांच्यावर नैराश्य ओढवले आणि त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली, असा आरोप फिर्यादी वडिलांनी पोलिसांत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here