शेडगावमध्ये बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला; पंचक्रोशीत भीतीचे वातावरण

0
45

संगमनेर : संगमनेर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी धोक्याचा विषय ठरत आहे. तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सायंकाळी बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटना अशी की, भारती फड या गुरुवारी सायंकाळी आई सिंधूबाई नागरे, भाऊ शुभम नागरे आणि चार वर्षांचा मुलगा श्रीधर यांच्यासह घास आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक श्रीधरवर हल्ला चढवला आणि त्याला उसाच्या शेतात खेचून नेले.

चिमुकल्याच्या किंकाळ्या ऐकताच आई भारती आणि आजी सिंधूबाई यांनी धाडसाने बिबट्याच्या मागे पळ घेतली. त्यांच्या आरडाओरडीनंतर बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. मात्र या हल्ल्यात श्रीधर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वन विभाग आणि प्रशासन बिबट्याच्या बंदोबस्तात कमी पडत असल्याचा नागरिकांचा आरोप असून तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here