संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप

0
169

संगमनेर : जोर्वे ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून संगमनेर पंचायत समितीत थोरात आणि विखे-पाटील समर्थक भिडले. एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. पोलिस बंदोबस्तात बैठक पार पडली, आरोपांची चौकशी व कारवाईच्या मागणीने राजकीय वातावरण तापले आहे.

मागील तीन वर्षापासून जोर्वे ग्रामपंचायतवर विखे गटाची सत्ता असून, आत्तापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली आहे. परंतु, या वस्तू गावात आलेल्या नाही. अनागोंदी कारभार केल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात गटाने करुन ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गुरुवारी (दि.26) संगमनेर पंचायत समितीवर घेराव आंदोलन करत पुढील एक महिन्यामध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा थोरात समर्थकांनी दिला आहे.

40 वर्षे सत्ता असूनही ज्यांना 40 कामे जमली नाही आणि आता गावातील विकासकामे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे त्यांना माहितीये की चुकीची कामे आम्ही करणार नाही म्हणून विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. या सर्व आरोपांची लवकरात लवकर चौकशी करावी. जर आरोप सिद्ध झाले नाही तर आरोप करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून जोर्वे ग्रामपंचायतवरील सत्ताधारी विखे गटाने केली आहे.

याबाबत जोर्वे गावचे सरपंच गोकुळ दिघे यांनी सांगितले की, इतिहासात कधी झाली नाही एवढी विकासकामे व योजना गरिबांपर्यंत पोहोचविल्यामुळे आमची वाढलेली लोकप्रियता बघून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जोर्वे गटात उभे राहण्यासाठी धडकी भरलेल्या इंद्रजीत थोरात यांनी वातावरण निर्मिती करण्यासाठी हे उद्योग सुरु केले आहे. मागच्या 40 वर्षांत काहीच न केल्यामुळे जनतेने यांना धडा शिकवला आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तरी इज्जत राहावी म्हणून त्यांचा चाललेला हा शेवटचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here