अहिल्यानगर : सर्वत्र चांगला पाऊस असल्याने शेतशिवार गजबजून गेलेली आहेत. जिल्ह्यात ९४ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढली आहे. मात्र पिकांना युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तसेच युरियाच्या गोणीसोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना करत आहेत.
कृषी सेवा केंद्र चालक वाढती मागणी लक्षात घेऊन युरिया हवा असेल, तर दुसरे खत शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. युरियाच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची सरसकट लूट केली जात आहे. विशेष म्हणजे कृषी सेवा केंद्र बदलले, की भावही बदलत आहे. काही ठिकाणी जादा दराने युरिया खतांची विक्री होत आहे.
युरिया खतासोबत अन्य १९/१९/१९ हे नत्र, स्फूरद व पालश असलेले खत व मायक्रोन्यूटन खते घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे कृषी केंद्र चालकांकडून लूट होत आहे. यावर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सध्या डीएपी वगळता अन्य खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. युरिया खतांसोबत अन्य २०० रुपयांचे नत्र, स्फूरद, पालाश हे १९/१९/१९ हे किलोचे खत घेण्याची सक्ती ठिकठिकाणी होताना दिसत आहे. यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.








