संगमनेरच्या राजकारणात रंगत वाढली; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या बैठकीने राजकीय हालचालींना गती

0
73

संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक आणि उंबरी बाळापूर या गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

आश्वी खुर्द येथील विखे पाटील महाविद्यालयात पार पडलेल्या या बैठकीत गावांतील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय विभागांचे अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यात थेट संवाद झाला असून, अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री विखे पाटील यांच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने मतदारांमध्ये विश्वास आणि जोश निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या बैठकीनंतर भाजप कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागतील यात शंका नाही. गेल्या वर्षभरात संगमनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या मोठी उलथापालथ झाली आहे. अशात आता संगमनेर तालुक्यातील राजकीय रंगत अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here