अहिल्यानगर जिल्ह्यातील 1223 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण यादी जाहीर, 300 ओबीसी तर 624 पद खुल्या वर्गासाठी

0
58

अहिल्यानगर : जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण यादीची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत राजपत्र जारी केले असून, एकूण 1223 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जाती, अनुसूचित जमाती, प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रामविकास विभागाच्या अहवालानुसार, एकूण 1223 ग्रामपंचायतींपैकी 624 सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्येही महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने खुल्या प्रवर्गातील 312 पदे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असणार आहेत.

इतर मागास वर्गासाठी (OBC) 300 सरपंचपदे राखीव ठेवण्यात आली असून, त्यापैकी 165 सरपंचपदे महिला उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. ओबीसी समाजातील महिलांना या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या नेतृत्वात आपली छाप उमटवण्याची संधी मिळणार आहे.

त्याचप्रमाणे, अनुसूचित जाती (SC) साठी 150 सरपंचपदे राखीव ठेवण्यात आली आहेत. या पैकी 75 सरपंचपदे अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. तसेच अनुसूचित जमाती (ST) साठी 119 सरपंचपदे आरक्षित असून, त्यापैकी 60 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ही आरक्षण यादी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी लागू राहील.

महिला सक्षमीकरणाला चालना
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याच्या धोरणानुसार या आरक्षण यादीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला नेतृत्व उभे राहून गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आरक्षण यादी जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांमधून ग्रामपंचायतींमध्ये नवे नेतृत्व उदयास येणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण यादीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारणाला नव्या दिशा आणि गती मिळणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here