संगमनेर : महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेस अत्याधुनिक ‘गुरखा’ (GURKHA) अग्निशमन वाहन मिळाले असून, या वाहनाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री लक्ष्मणबाबा मंदिरात पारंपरिक आरतीने झाली. यानंतर विधिवत पूजा करून ‘गुरखा’ वाहनाचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे अग्निशमन वाहन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, शहरात उद्भवणाऱ्या आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये त्वरित प्रतिसाद देण्यासाठी वाहन मोलाचे ठरणार आहे.
तसेच, या नव्या वाहनाच्या मदतीने लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचून मदतकार्य राबवणे अधिक सोपे होणार आहे. नगरपरिषदेने घेतलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आपत्कालीन व्यवस्थापनात आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णायक ठरणार आहे. हे ‘गुरखा’ वाहन अग्नीशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्याने संगमनेर शहर आणखी सक्षम, सुरक्षित आणि सजग होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
अत्याधुनिक यंत्रसामग्री, जलद प्रतिसाद क्षमता आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत सहज हालचाल करण्याची क्षमता असलेले ‘गुरखा’ वाहन संगमनेरच्या अग्निशमन दलासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भविष्यातील आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी शहर सज्ज असल्याची खात्री यानिमित्ताने नागरिकांना मिळाली आहे.








