पुणे-नाशिक महामार्गावरील जीवघेणे अपघात; ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
28

संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या नसल्याने गेल्या काही काळात तब्बल ३० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

या गंभीर प्रकरणी शंकर रामचंद्र कड इन्फ्रा प्रा. लि. कंपनी व ठेकेदार अभिलाश रामचंद्र कड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी हिवरगाव पावसा येथील शेतकरी व शिवसेना पक्षाचे उद्योग सेना जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव यांनी संगमनेर घारगाव व घुलेवाडी ग्रामीण पोलिस ठाण्यात अर्ज देऊन केली आहे.

पोलिसांना दिलेल्या लेखी अर्जात नमूद केले आहे की, पुणे-नाशिक हायवेचे काम सदर कंपनीकडे सुरू आहे. मात्र या कामात पारदर्शकता नसून निकृष्ट दर्जा असल्याने अनेक अपघात झाले आहेत. काम सुरू असताना आवश्यक दिशा फलक, चेतावणी फलक किंवा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

सोमनाथ भालेराव यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत या महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये साधारण ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात विविध गावकऱ्यांनी घारगाव व घुलेवाडी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र अद्यापही ठेकेदार कंपनीवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.

भालेराव यांनी अर्जात असा आरोप केला आहे की, त्यांनी यासंदर्भात ठेकेदार अभिलाश रामचंद्र कड यांना फोनवर विचारणा केली असता, उलट “तुम्ही मला ब्लॅकमेल करता आहात” अशी धमकी देण्यात आली. यावरून ठेकेदार मनमानी करत असल्याचे स्पष्ट होते.

याशिवाय, महामार्गासाठी देण्यात आलेली ॲम्बुलन्स सेवा अपघात स्थळी वेळेवर पोहोचत नाही, यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळत नाही व नागरिकांचा विनाकारण बळी जात आहे.

“सदर कंपनीवर मनुष्यवधासह संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर शिवसेना महायुतीच्या वतीने हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” होणाऱ्या नुकसानीस व कायदा सुव्यवस्थेस ठेकेदार जबाबदार राहील असा इशाराही अर्जदार भालेराव यांनी दिला आहे.

शिवसेना उद्योग सेना जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, उपसरपंच गणेश दवंगे, सोमनाथ दवंगे भाजपा उप जिल्हाध्यक्ष काशिनाथ पावसे, तुषार पावसे, दीपक भालेराव, बच्चन भालेराव, केशव दवंगे, किरण पावसे यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here