अहिल्यानगर जिल्ह्यात हजारो लाडक्या बहिणी अपात्र, ‘या’ कारणांमुळे पैसे मिळणे होणार बंद

0
33

अहिल्यानगर :  लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांची पडताळणी वेगवेगळ्या पातळीवर राज्य सरकारकडून केली जात आहे. आवश्यक कागदपत्र, अटी शर्तींची पुर्तता, ई-KYC यांच्या अधारे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे.

ऑफलाइन केलेल्या पडताळणीत जिल्ह्यातील १ लाख २६ हजार महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. या पडताळणीत एकाच कुटूंबातील दोन लाभार्थी अशा १४ हजार तर वयाच्या अटी पूर्ण न करणाऱ्या दीड हजार असे १५ हजारांहून अधिक महिलांची नावे कमी करण्याचा अहवाल राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आला आहे. महिलांची पडताळणी गाव पातळीवर अंगणवाडी सेविका आणि महिला कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली होती. यामुळे लाडकी बहिण योजनेतील अनुदानाचा पुढील हप्ता न येणाऱ्या महिलांचा या योजनेतून पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे.

राज्य सरकारच्यावतीने एकाच कुटूंबील दोन लाभार्थी अशा १ लाख १९ हजार महिलांची तर वयाच्या अटीत न बसणाऱ्या ७ हजार महिलांची यादी महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली होती. या यादीतील महिलांची पडताळणी गाव पातळीवर अंगणवाडी सेविका आणि महिला कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली. ही पडताळणी पूर्ण झाली असून यात १५ हजारांहून अधिक महिला अपात्र करण्यात आल्या असून १ लाख १० हजारांहून अधिक यादीतील महिला लाभार्थी यांना पात्र ठरवण्यात आल्याचे सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.

लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यातून १२ लाख ४१ हजार ८७६ महिलांनी अर्ज केले होते. यातील ११ लाख २६ हजार ६५२ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. यातील १ लाख २६ हजार महिलांचे अर्ज शासनाने पडताळणीसाठी पाठवले होते. तर १७८ महिलांनी स्व इच्छेने योजनेचा लाभ नाकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here