अकोले तालुक्यात नव्या दरोडेखोर टोळीची दहशत; गुंगीच्या औषधाने बेशुद्ध करून चार घरे लुटली

0
41

अकोले : चोर-दरोडेखोर चोरीच्या नवीनच कला शोधून काढत आहेत. असाच प्रकार अकोले तालुक्यातील वाघापूर गावात घडला. दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार घरांमध्ये घुसून दरोडेखोरांनी घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचे औषध लावलेले कापसाचे बोळे फिरवले. त्यानंतर बेशुद्धावस्थेचा फायदा घेत त्यांनी रोख रक्कम, दागिने आणि मौल्यवान वस्तू लुटल्या.

या हल्ल्यात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यासाठी दरोडेखोरांनी तिचे कान जोरात ओढल्याने कान जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अकोले तालुका आणि आसपासच्या परिसरात या नव्या दरोडेखोर टोळीची दहशत निर्माण झाली आहे.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संदीप लांडे, जय औटी, यमुनाबाई औटी आणि भाऊसाहेब लांडे यांच्या घरांवर हा दरोडा पडला. दरम्यान, सकाळी तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर वाघापूरसह अकोले तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी लवकरात लवकर पकडले जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक मोहन बोरसे आणि त्यांचे पथक अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here