भंडारदरा व निळवंडे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन क्षमतांचा योग्य वापर करून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती घडवून आणण्यावर भर देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. या परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने त्या विकसित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता स्वप्रिल काळे, नाशिकचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, निळवंडे प्रकल्प अभियंता प्रदीप हापसे, गणेश हारदे आदी उपस्थित होते.
भंडारदरा धरण शताब्दी वर्षानिमित्त पर्यटन विकास आराखडा
भंडारदरा धरणाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी वेगाने करण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले. त्यांनी विभागाच्या ताब्यातील विविध जागांची पाहणी करत, त्या जागांचा पर्यटन विकासासाठी वापर करण्यासाठी सुचना केल्या.
गेल्या काही वर्षांत झालेल्या अतिक्रमणांमुळे विभागाच्या जागांचा उपयोग प्रभावीपणे होऊ शकला नव्हता. परंतु आता या जागा अतिक्रमणमुक्त करून पर्यटनासाठी विकसित करण्याच्या धोरणावर काम सुरू आहे. रंधाफॉल परिसरात पर्यटन सुविधा उभारणे, नवीन आकर्षणे निर्माण करणे, पायाभूत सुविधा सुधारण्याचे नियोजन देखील या आराखड्यात करण्यात आले आहे.
निळवंडे धरण परिसरातील विकासकामांना गती
निळवंडे धरण परिसरातील गाव रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सुधारणा, तसेच धरणग्रस्तांच्या जमिनीविषयक प्रलंबित प्रश्न यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. परिसरातील पर्यटन विकासासोबतच स्थानिक रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यावरही भर दिला जाईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.








