संगमनेर : तालुक्यातील रहीमपूर येथे शासनमान्यतेने १४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामुळे आता आवडते शिक्षक आपल्याला सोडून जाणार या विचारानेच विद्यार्थी भावनिक झाले. अकरा वर्षांपेक्षा जास्त काळ गावातील शाळेत सेवा देणारे शिक्षकांच्या बदल्या होणार हे समजताच ग्रामस्थ व पालक व्यथित झाले. वर्षानुवर्ष नकळत जोडलेले ऋणानुबंध उद्यापासून तुटणार आहेत या भावनेने सर्वांच डोळ्यात पाणी आले.
या सर्व शिक्षकांचा ग्रामपंचायतीकडून आदर सत्कार करण्यात आला. गाव तेथील विद्यार्थी आणि गावकर्यांसोबतचे नाते असेच घट्ट राहील असा विश्वास व्यक्त केला गेला. मात्र या निरोप समारंभात रहीमपूर येथे भावनिक वातावरणात निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “आपल्या हातून शिकलेले चिमुकले उद्या नाव मोठं करतील,” असा विश्वास व्यक्त केला.
गावाला लाभलेले आदर्श शिक्षक, “पहिले गुरु” म्हणून चिमुकल्यांच्या हातात पेन कसा धरायचा यापासून शिकवणारे, तर जिल्हा परिषद शाळेत खडू-मार्करने ज्ञानदानाची वाटचाल करणाऱ्या तब्बल १४ शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या अकरा वर्षांच्या अखंड सेवेनंतर शासनमान्य बदली झाल्याने गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.
शिक्षकाचे खरे कार्य हे फक्त शाळेपुरते मर्यादित नसते, तर ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असते. बरोबर असताना कौतुक, चुकल्यास प्रेमाने दुरुस्ती हीच त्यांची खरी ओळख. या निस्वार्थ सेवेचा गावाने मनापासून गौरव केला.
या निरोप सोहळ्याला सरपंच सविता शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम शिंदे पाटील, उपसरपंच राहुल गुळवे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर गुळवे, तसेच सचिन शिंदे, पप्पू गाडे, अरुण शिंदे, गजानन शिंदे, शिवाजी शिंदे, सोपान गुळवे, विजय वाळुंज, वामन शिंदे, संदीप शिंदे, दत्तू खुळे, विलास गुळवे, राजेंद्र वाळुंज, लक्ष्मण शिंदे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मांडरे उपस्थित होते.








