सोशल मीडियावर महिलांकडून मैत्रीचे आमिष; श्रीगोंदा तालुक्यातील तरुणाला डांबून ठेवून ५ लाखांची मागणी

0
152

अहिल्यानगर : सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष दाखवून श्रीगोंदा तालुक्यातील एका तरुणाला भेटायला बोलावून, त्याला डांबून ठेवत मारहाण करून तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथील सोमनाथ सुभाष निंबाळकर यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कोयल शिंदे, नीलम, अज्ञात चार व्यक्ती आणि एका महिलेसह एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीला सोशल मीडियावर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्या महिलेने व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून जवळीक वाढवली व भेटायला बोलावले. ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास तो मोटारसायकलवरून कुर्डूवाडी येथे गेला. त्यावेळी आरोपी महिलेने लोकेशन पाठवून सांगितलेल्या ठिकाणी बोलावले होते.

तेथे एक महिला आणि तिची मैत्रीण भेटल्या; परंतु लगेचच अंधारातून पाच ते सहा जणांनी त्याच्यावर झडप घालत तोंडावर रुमाल लावून जबरदस्ती उचलून नेले. त्याला एका पत्राशेडमध्ये डांबून ठेवून “पाच लाख रुपये दे, नाहीतर जीव गमवशील” अशी धमकी देण्यात आली.

त्या ठिकाणी फिर्यादीचे हात-पाय बांधून कपडे काढले गेले व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. रात्रीभर तो कैदेत होता. मात्र सकाळी पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकून त्याने मदतीचा इशारा दिला आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याची सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here