विरोधकांची माघार; प्रवरा कारखाना बिनविरोध

0
60

राहाता – जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी आज, बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी विखे गटाकडून २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी शेतकरी मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे.

असे असली तरी १५ ते २९ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतरच निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा होईल. सत्ताधारी विखे गटाने संचालकपदी २१ नविन तरूण चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुन्या संचालकांचा अपेक्षाभंग झाला.

मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे राजकीय हाडवैरी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकाराचा नियम पाळत एकमेकांच्या कारखाना निवडणुकीत हस्तक्षेप न केल्याने यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्येही विखे कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. हीच परंपरा दोन्ही नेत्यांनी यंदाही पाळल्याचे स्पष्ट झाले.

मंत्री विखे यांचे परंपरागत विरोधक प्रवरा शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती. परंतु त्यांना अपेक्षित राजकीय पाठबळ न मिळाल्याने त्यांनी विखे कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here