सुजय विखेंनी लोकसभेतल्या पराभवाचा तनपुरे कारखाना निवडणुकीत काढला वचपा, खा. निलेश लंके समर्थकांचा सुपडा साफ कार्यक्रम!

0
111

राहुरी (प्रतिनिधी) – डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचंड उलथापालथ झाली असून, जनसेवा पॅनलने २१-० अशा निर्णायक फरकाने विजय मिळवत शेतकरी विकास मंडळाचा साफ पराभव केला. या निकालानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा हिशेब खासदार डॉ. सुजय विखेंनी या निवडणुकीत चुकता केला आहे.

शेटे गटाचा सुपडा साफ

या निवडणुकीत राजू शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पाठबळावर निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मात्र, त्यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शेटे यांनी नीलेश लंके यांना साथ देत विखेंविरोधात प्रचार केला होता. आता या पराभवाचा बदला घेतल्याचा आरोप विखेंवर केला जात आहे.

तनपुरे गटाचा भक्कम विजय

तनपुरे गटाच्या जनसेवा पॅनलने सर्व २१ जागांवर एकहाती विजय मिळवला. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी खासदार अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही लढत लढवण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून तनपुरे गटाचा कारखान्यावर मजबूत प्रभाव आहे. कार्यकर्त्यांचे जाळे, मतदारांना केंद्रापर्यंत आणणारी रणनीती आणि भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारीचं आश्वासन – या सर्वांनी एकत्रितपणे विजयाची दिशा ठरवली.

विखेंची तटस्थता की रणनीती?

खासदार सुजय विखे यांनी या निवडणुकीत तटस्थ असल्याचे जाहीर केले असले तरी, त्यांच्या भूमिकेमुळे जनसेवा पॅनलला अप्रत्यक्ष फायदा झाला. शेतकऱ्यांनी हिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले होते. राजकीय निरीक्षकांच्या मते, हीच त्यांची डावपेचाची रणनीती होती, ज्यामुळे शेटेंचा पॅनल कोसळला.

कारखाना बचाव समितीचीही हार

या निवडणुकीत अमृत धुमाळ यांच्या कारखाना बचाव कृती समितीनेही भाग घेतला होता. मात्र, तनपुरे गटाच्या तुलनेत त्यांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तनपुरे गटाने मतदारांमध्ये असलेली पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

विखेंचा राजकीय परतवार

संगमनेरात बाळासाहेब थोरात, पारनेरमध्ये राणी लंके आणि आता राहुरीत प्राजक्त तनपुरे यांच्या विजयात विखेंचा अप्रत्यक्ष हात असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेतील पराभवाचा सूड अशा प्रकारे काढून, विखे यांनी आपल्या विरोधकांना रणनीतीनं उधळून लावल्याचं चित्र आहे.

राजकारणात नवा रंग

या निवडणुकीच्या निकालानंतर राहुरीसह नगर जिल्ह्याच्या राजकारणाला नवा कलाटणी मिळाली आहे. तनपुरे गटाची ताकद अधोरेखित झाली असून, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत या विजयाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here