अहिल्यानगर (नेवासा) : येत्या २९ मार्चला असल्याने शनि अमावस्या शनिशिंगणापूरला यात्रौत्सवाच्या निमित्ताने नियोजनाची तयारी कालपासूनच सुरु करण्यात आली असून पुढील आठवड्यात शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त बैठक शनिशिंगणापूरला होणार असून यंदाच्या शनि अमावस्या यात्रौत्सवास भाविकांच्या गर्दीचे व दर्शन व्यवस्थेचे काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे.
शनि अमावस्या यात्रौत्सवाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व विभाग प्रमुखांच्या बैठका सुरु आहेत असे देवस्थान विश्वस्त मंडळ अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.
यात्रा नियोजनात भाविकांच्या वाहन पार्किंग व्यवस्था, दर्शनरांग गर्दीवर नियंत्रण, चौथऱ्यावरील दर्शन रांग, शनिभक्तांच्या सोयी सुविधा यावर मंडळ व विभाग प्रमुख यांच्यातील बैठकीत चर्चा झाली. तर महसूल, पोलीस यंत्रणेसह सर्व सरकारी यंत्रणाच्या संयुक्त बैठकीसाठी देवस्थान संबंधित सरकारी यंत्रनेला पत्रव्यवहार करणार आहे. देवस्थान विश्वस्त मंडळ व सर्व सरकारी यंत्रणा यांची संयुक्त नियोजन बैठक पुढील आठवड्यात शनिशिंगणापूरला होणार आहे. त्या बैठकीच्या दृष्टीनेही नियोजन सुरु आहे.
गेल्या एक मार्चपासून शनिदेवाच्या चौथऱ्यावरचा तैलाभिषेक ब्रँडेड तेलानेच करावा, असे आवाहन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही देवस्थान विश्वस्त मंडळाने सुरु केलेली आहे. शनिअमावस्येलाही चौथऱ्यावर तैलाभिषेक करणाऱ्या भाविकांची संख्या यंदा दुपटीने वाढेल, असा देवस्थानचा अंदाज असून यात्रौत्सव काळात चौथरा दर्शन गर्दीचे नियोजन कसे करता येईल, यावरही नियोजन बैठक होणार आहे.
दर शनि अमावस्येला भाविकांना मोफत महाप्रसाद वाटप करणाऱ्यांत पंजाब राज्यातील शनिभक्त मंडळांची संख्या अधिक असते. दिल्ली, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आंध्र, तेलंगना, हिमाचल प्रदेश, गुजरात येथील भाविकांसह देश विदेशातील भाविकही या दिवशी शनिदेवाच्या दर्शनाला येत असतात.
भाविकांना दर्शन सुखकर होईल यासाठी देवस्थान समिती नियोजन करत आहे. देवस्थान कर्मचारी सर्व विभाग, बर्फी प्रसाद विक्री, तेल विक्री काउंटर, देवस्थान महाप्रसादालय, भक्त निवास स्थाने आदी नियोजन केले जाणार आहे. गेल्या शनिअमावस्येपेक्षाही यावेळी भाविकांची गर्दी वाढेल असा अंदाज धरून नियोजन केले जात आहे.








