शेतकऱ्यांना दिलासा : अटी-शर्ती बाजूला ठेवून सरसकट पंचनाम्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

0
112

अहिल्यानगर : तालुक्यातील वाळकी, केडगाव आणि चास या तीन मंडलांतील सुमारे ४५ गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरं आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही परिस्थिती पाहून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अटी-शर्ती बाजूला ठेवून सरसकट पंचनाम्यांचे आदेश दिले.

या नैसर्गिक आपत्तीत सुमारे २८०० मेट्रिक टन कांदा आणि २९ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले असून अनेक जनावरे वाहून गेली आहेत. घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ते व बंधारेदेखील पाण्यामुळे उध्वस्त झाले आहेत.

पालकमंत्र्यांसोबत या दौऱ्यात आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, पोलिस अधिकारी प्रल्हाद गीते व इतर प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त गावांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतपिकांचे तातडीने पंचनामे करा

विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की, कांदा, फूलशेती, फळबागा यासह सर्व पिकांचे सरसकट पंचनामे तातडीने करावेत. अकोळनेर गावातील फुलशेतीचेही विशेष उल्लेख करून त्यांनी नुकसान भरपाईबाबत गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश दिले. कांदा साठवणूक करताना झालेले नुकसानदेखील पंचनाम्यात समाविष्ट करावे, असे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत, तिथे ‘गाळमुक्त तलाव’ योजनेतून माती आणण्यासाठी अनुदान मिळविण्याचा पर्याय शोधण्याचे निर्देशही दिले.

फळबागा, चारा आणि जनावरांचे नुकसानही नोंदवा

अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून मृग बहार गळून पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळबागांचेही पंचनामे सरसकट करावेत, अशी सूचना त्यांनी केली. जनावरांचे चारा-पिके वाहून गेल्यास तातडीने चारा उपलब्ध करून द्या आणि वाहून गेलेल्या जनावरांचेही पंचनामे करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

सोनेवाडी येथील महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या अनधिकृत बांधकामामुळे झालेल्या नुकसानाची तक्रार शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर त्वरित कारवाईचे आदेश देत विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, अशा बांधकामांवर कठोर कारवाई करा आणि ओढे-नद्यांचे प्रवाह मोकळे करा. अहिल्यानगर शहरातील अतिक्रमित बांधकामांवरही प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन

पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धान्य वाटप, जनावरांसाठी चारा, आणि रस्ते-बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने यंत्रसामग्री वापरण्याचे आदेश दिले. गरज भासल्यास विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे त्यांनी आश्वस्त केले.

या निर्णयांमुळे अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here