लोणी : विद्यार्थ्यांनी परिस्थितीला जिद्दीने सामोरे गेले पाहिजे. प्रवरे मुळे घडलो आणि आज सक्षमपणे उभा राहिलो, यामध्ये प्रवरेचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. या संस्थेने ग्रामीण शिक्षणाचा पाया भक्कमपणे टिकवून ठेवला असल्याचे गौरवोद्वार संस्थेचे माजी विद्यार्थी आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काढले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम मंत्री जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्ताने वस्तीगृहाच्या इमारतीचे भुमीपूजन त्याच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आ. नितीन भोसले, उपकार्यकारी अधिकारी अरविंद पारगांवकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, दत्ता पाटील, भाऊसाहेब जहऱ्हाड, श्याम मिसाळ, विक्रम शिंदे, राजेश भाटे, डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ.व्ही आर. राठी, प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने आदींसह सर्व विभाग प्रमुख विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
ना. मकरंद जाधव पाटील म्हणाले की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारातून ग्रामीण परिवर्तनाचा आदर्श निर्माण केला आहे. आज शहरी भागामध्ये अनेकांनी संस्था काढल्या. परंतु, प्रवरा शैक्षणिक संकुल हे ग्रामीण भागातील एकमेव संकुल आहे की, ज्या संकुलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कष्टकरी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणातून मोठा आधार मिळाला. ग्रामीण शिक्षणाचा पाया संस्थेने मजबूत केल्यामुळेच माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनो नवनवीन तंत्रज्ञान अवगत करत असतानाच विविध शिक्षणातून आपण जिद्दीने पुढे गेले पाहिजे. शिक्षणाबरोबरच आपण मैदानी खेळाला महत्व देण्याचे आवाहन करून मनाची एकाग्रता आणि आयुष्यातील जय पराजय आपल्याला मैदानावरच समजतो. आपणच देशाचे आधार स्तंभ आहात, नवी आव्हान स्विकारून आपल्याला पुढे जायचे आहे. विखे पाटील परीवाराची चौथी पिढी सहकार आणि शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देत असल्याचा अभिमान व्यक्त करून जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना महाविद्यालयात असताना पाहाण्याचा योग आला. अतिशय साधी राहाणी आणि मोठा विचार घेवून त्यांनी या भागात काम उभे केले, यामागे मोठी दूरदृष्टी असल्याचे जाधव म्हणाले. यावेळी अरविंद पारगांवकर यांनी भारत हा तरुण देश आहे. तरुणांना नवनवीन तंत्रज्ञान देण्यामध्ये प्रवरा संस्था महत्त्वपूर्ण काम करीत असून, या माध्यमातून प्रवरेचा विद्यार्थी हा प्रत्येक गोष्टीत पुढे असल्याचे समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी चाणक्य असले पाहिजे आणि चाणक्य बुद्धीतून पुढे गेले पाहिजे. येणाऱ्या काळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी आणि आहिल्यानगर या ठिकाणी होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार असून, रोजगार निर्मितीसाठी लार्सन अँड टर्बो कायम आपल्या सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.








