रोहिणी नक्षत्रावर यंदा पेरणी नाहीच; अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाला सुरूवातीलाच खीळ

0
57

सुपा (ता. पारनेर) – यंदा रोहिणी नक्षत्राने शेतकऱ्यांसाठी आशेऐवजी चिंता आणली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुपा परिसरात शेतीकामांवर मोठा परिणाम झाला असून, शेतात दलदल झाल्याने पेरणी पूर्णपणे खोळंबली आहे. परिणामी, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अडथळे निर्माण झाले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे.

‘रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ अशी जुनी म्हण यंदा मात्र खोटी ठरली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीसाठी योग्य मानले जाणारे रोहिणी नक्षत्र यंदा अवकाळी पावसाच्या विळख्यात सापडले. सुपा व परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. या पाणथळ जमिनीमुळे नांगरणी, कुळवणीसह अन्य मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे खरीप पेरणीस लागणारी पूर्वतयारी होऊ न शकल्याने हंगाम वेळेवर सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

अवकाळी पावसाने खरिपालाच खिंडार

मे अखेरीपासून आणि जूनच्या प्रारंभाला झालेल्या अवकाळी पावसाने सुपा भागात शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले. शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेतीची मशागत करता आली नाही. ओढे, नाले, तलाव भरून वाहू लागले, नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी, शेतजमीन दलदलमय बनली आणि खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेली जमीन सिद्ध होत नाही, तोवर पेरणी करता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात पीक वेळेवर घेणे अशक्यप्राय होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

उन्हाळी पिकांचाही झाला मोठा फटका

फक्त खरीपच नाही, तर यंदाच्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचाही पुरता बोजवारा उडाला आहे. भुईमूग, कांदा यांसारखी पिके काढणीला आली असताना पावसाने त्यांना चांगलाच फटका दिला. पिके शेतातच भिजून सडली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांचा भर होता, मात्र आता पाणी साचल्यामुळे तो खराब झाला. त्यामुळे हजारोंच्या नुकसानात शेतकऱ्यांचा खर्च फुकट गेला आहे. यामुळे अनेकांची आर्थिक गणिते कोसळली आहेत.

शेतकरी संकटात; शासनाच्या आश्वासनांवरच अपेक्षा

शेती हे निसर्गाधिष्ठित क्षेत्र असल्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. सुपा परिसरातील स्थानिक जाणकारांचे म्हणणे आहे की, अनेक दशकांनंतर रोहिणी नक्षत्रात पेरणी करता आली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याआधी “उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी” ही म्हण बिंबवली जात होती, पण आता शेतात काम करूनही मिळकतीची खात्री राहिलेली नाही. उत्पादन खर्च वाढला, भाव नाही आणि मदतीसाठी फक्त राजकीय गोड शब्द. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.

थोडी उघडकीची चाहूल

दरम्यान, गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे. नांगरणी, बांध घालणे, कुळवणी अशा कामांमध्ये वेग दिसू लागला आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी ओलाव्याचा अडथळा आहे. पेरणीसाठी योग्य वेळ निवडावी लागणार आहे आणि हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची निवड करावी लागणार आहे. अन्यथा पुढील हंगामावरही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here