मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यावर, सरकारने घेतला मोठा निर्णय

0
48

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही, मात्र लवकरच हा निधी त्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. एप्रिल महिन्याचा हप्ता २ आणि ३ मे रोजी जमा झाला होता. त्यामुळे महिलांमध्ये मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. आता हा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 419.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच जमा केला जाणार आहे. गुरुवारी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

योजनेअंतर्गत आतापर्यंत १० हप्ते वितरित करण्यात आले असून, ११ वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाईल. ही योजना मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आली असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचा उद्देश तिच्यामागे आहे.

या योजनेसाठी आतापर्यंत एकूण 3960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधूनच मे महिन्याचा 410 कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे. हे अनुदान महिला व बालविकास विभागाला अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहे.

शिंदे सरकारने सुरू केलेली ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक उन्नतीसाठी शासन पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू असून, लवकरच मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here