पुणतांबा : गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील विद्यार्थी, ग्रामस्थ यांची सातत्याने मागणी असलेल्या पुणतांबा-वाकडी फाटा रस्त्याचे काम सुरू झाले. हे काम पुणतांब्याच्या बाजूने सुरू व्हावे, असे पुणतांबेकरांचे तर वाकडी फाट्याच्या बाजूने सुरु व्हावे असे जळगाव व येलम वाडी ग्रामस्थांचे मत होते. मात्र सध्यातरी वाकडी फाट्याच्या बाजूने काम सुरु झाले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी दोन कोटी रुपयाचा निधी यापूर्वीच मंजूर झाला होता. आता अंदाजे सव्वा चार कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम होणार असून त्यात ३ ठिकाणी सीडीवर्क असून अंदाजे १ कोटी ५१ लाख रुपयाची निविदा असल्याचे समजते.
काम वाकडी फाट्याकडून पूर्ण झाले तर पुणतांब्याच्या बाजूने २ किलोमीटर लांबींचा खराब रस्ता तसाच राहण्याची शक्यता असल्याची भावना ग्राम स्थांनी व्यक्त केली. कामात काही अडचणी आणत असल्याची चर्चा असून निविदेतील कार्यादेशानुसार चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे, अशी मागणी पुणतांबा वाकडी रोडवरील अनेक ग्राम स्थांनी केली आहे. कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणात रुंद आहे. सध्या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे.








